
वाळूज महानगर, (ता.7) – सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी (ता.6) रोजी छत्रपती संभाजीनगर येथे कारवाई करून मुदतबाह्य गोवर्धन गाईच्या तुपाचा तब्बल 2 लाख 89 हजार 380 रुपयांचा साठा जप्त केला. त्यामुळे खरेदी करताना सावधगिरी बाळगा, नसता तुम्ही मुदतबाह्य तुपाचा बळी ठरू शकता.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईबाबत सहआयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांनी माहिती दिली की, अन्न व औषध प्रशासन विभागाने सणासुदीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ बाजारात येऊ नयेत. यासाठी विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत, छत्रपती संभाजीनगर-मुंबई महामार्गावरील करोडी येथील पारीस मिल्क फूड्स लि. (गट क्र. 191) या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान, गोवर्धन ब्रँडच्या गाईच्या तुपाचे 1 हजार 824 कागदी बॉक्स आढळून आले. या साठ्यात 18.4 किलो वजनाचे 364.8 लिटर आणि 16.4 किलो वजनाचे 384.8 लिटर अशा दोन प्रकारांतील तुपाचा समावेश होता. तपासणीत या तुपाची विक्री मुदत (एक्सपायरी डेट) संपल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तात्काळ नमुने घेऊन उर्वरित साठा निकृष्ट दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या तुपाचे नमुने अन्न विश्लेषण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले असून, अहवालानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत करण्यात आली आहे. सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधील सर्व अन्न व्यावसायिकांना स्पष्ट इशारा दिला की, मुदतबाह्य, भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवू नका. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. सणासुदीच्या काळात ग्राहकांनीही सजग राहावे. खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील निर्मिती दिनांक, मुदत (Expiry Date) आणि FSSAI परवाना क्रमांक तपासावा. संशयास्पद पदार्थ आढळल्यास त्वरित अन्न व औषध प्रशासन विभागाशी संपर्क साधावा. असे आवाहन ही त्यांनी केले.
