March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.13) – मी मराठा, समाजासाठी एक जीव माझापण मी आरक्षणासाठी जीव देत आहे. असा व्हॉटसअ‍ॅप मॅसेज टाकून वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथील 20 वर्षीय तरुणाने कायगाव येथील गोदावरी नदीत उडी मारून मंगळवारी (ता.12) रात्री 9 वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे. म्हणून कायगावच्या गोदावरी नदीच्या पुलावरील ही दुसरी घटना आहे. यामुळे सरकार विषयी मराठा समाजातून चीड निर्माण होत आहे.


मराठा आरक्षणासाठी सर्वत्र रान पेटलेल्या असतानाही सरकार मराठा समाजास आरक्षण देत नसल्याने तरुणांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. त्याचाच परिणाम म्हणून वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथील ओम मोहन मोरे (20) याने मराठा आरक्षणासाठी जीवाचे बलिदान दिले. ओम मोरे हा वडगाव कोल्हाटी येथे कुटूंबासह राहुन वाळूज औद्योगिक परिसरातील भैरव इंडस्ट्रीज मध्ये खासगी नोकरी करत होता. दरम्यान, मंगळवारी (ता.12) रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे कंपनीत गेला होता. संध्याकाळी कंपनी सुटल्यानंतर रात्री 8.30 वाजले तरी घरी तो आला नाही म्हणून, त्याच्या आईने कंपनीत विचारपूस केली. त्यावेळी तो कंपनीतून 5 वाजताच गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, 8.40 वाजेच्या सुमारास त्याने घरच्या मोबाईलवर मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याचा व्हॉटसअ‍ॅपवर मॅसेज केला. ओमच्या कूटूंबियाने तत्काळ त्याचा परिसरात शोध सुरू केला. मात्र, तो मिळून आला नाही. म्हणून त्याच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
पोलिसांची धावपळ
दरम्यान, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी नेवसा पोलीस ठाण्याला ही माहिती कळविली. त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोह योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेंद्र उदे, वाळूज ठाण्याचे पोउपनि. भगवान मुजबुलेे यांच्या पथकाने कायगाव येथील गोदावरी नदी येथे धाव घेतली. त्यावेळी त्यांना ओमची दुचाकी (एम एच.20, एफ झेड – 5507) पुलावर दिसून आल्याने त्याचा आजूबाजूला शोध घेतला असता तो मिळून आला नाही. दरम्यान गंगापूर पोलीस ठाणे व नेवास पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्रभर शोध घेतला असता तो मिळून आला नाही.
नेवासा पोलीस ठाण्यात नोंद-
दरम्यान, बुधवारी (ता.13) रोजी सकाळी अग्नीशमन विभागाच्या जवानांनी व मच्छिमारांनी नदीत शोध घेतला असता दुपारी 12 वाजेच्या सुमाराम ओमचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.


असा आहे व्हाट्सअप मेसेज –
आय मीस यु मम्मी, आय मीस यु जय आणि पप्पा. मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे. समाजासाठी एक जीव माझापण, आणि जय मम्मीच्या कायम सोबत राहा, माझा मम्मीमध्ये खूप जीव आहे. आणि यापुढेही चांगली जिंदगी जगा. कायगाव मीस यु जिंदगी, आय मोर मोर मोर लव यु मम्मी. असा मॅसेज व्हॉटसअ‍ॅपवर टाकला होता.
मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
गोदावरी नदीच्या पाण्याबाहेर काढण्यात आलेल्या ओमच्या मृतदेहावर नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यावेळी नेवासाचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक एस. जी. ससाणे, हे.कॉ. बर्डे, माने, राम वैद्य, अरविंद वैद्य, मुकिंदपुरचे सरपंच सतीश निपुंगे, राजेंद्र उंदरे, भाऊसाहेब वाघ आदी उपस्थित होते.
गोदावरीच्या पुलावरील दुसरी घटना
हुतात्मा काकासाहेब शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी जुने कायगाव येथील गोदावरी नदीपात्रात 23 जुलै 2018 रोजी जलसमाधी घेतली होती. या घटनेला 5 वर्षे पूर्ण होऊनही मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळाले नाही. समाजाकडून आरक्षणासाठी सुमारे 58 वर मोर्चे काढण्यात आले. अनेक समाजबांधवांनी बलिदान दिले. मात्र, अजूनही आरक्षण आणि अन्य मागण्या प्रलंबित असल्याने मराठा समाज प्रचंड नाराज आहे. हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या जलसमाधी नंतर कायगाव टोका येथील मराठा आरक्षण मागणीसाठी युवकाने बलिदान दिल्याची ही दुसरी घटना आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सरकार विरोधी भावना व चीड निर्माण होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *