
वाळूजमहानगर, (ता.21) – सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असलेल्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीचा फीस वेळेवर न भरल्याच्या कारणावरून वेळोवेळी मानसिक छळ करत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी बजाजनगर येथील पोलीस भरती, रेल्वे भरती, वनरक्षक व इतर शासकीय नोकरीचे प्रशिक्षण देणाऱ्या गरुड झेप अकॅडमी च्या संस्था चालकासह पाच जणांविरुद्ध मंगळवारी (ता.20) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सावखेडा ता. पाचोरा जि. जळगाव येथील लीना श्रीराम पाटील (19) या विद्यार्थिनीने सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून जून 2022 मध्ये बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमी प्रवेश घेतला होता. त्यासाठी तीन टप्प्यात 1 लाख 20 हजार रुपये तसेच भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी मेस खानावळ)चे 4 हजार 500 रुपये प्रति महिना नियमित भरत होते. मेसचे दरमहा पैसे भरणे असल्याने कधीकधी ते भरण्यास उशीर होत होता. तेव्हा लीना हिचा वडिलांना फोन यायचा व ती सांगायची की, पप्पा मेसचे पैसे नियमित भरत जा. इकडे पैसे भरले नाही तर, नाश्ता सुद्धा देत नाही. हे प्रशिक्षण खूप अवघड आहे. पैसे भरले नाही तर निलेश सोनवणे सर हे मानसिक त्रास देऊन अपमानास्पद वागणूक देऊन बाकीच्या मुलांमध्ये अपमान करतात. तसेच मी सावळी असल्याने ते मला ये काळी असे म्हणून हिनवतात. मला येथे शिकायचे नाही. असे ती रडून सांगत असे. मात्र तिची आम्ही समजूत काढत होतो. 
तसेच या फिर्यादीत असेही नमूद आहे की, लीना हिने आत्महत्या केल्यानंतर सुद्धा संस्था चालक निलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, व्यवस्थापक राठोड, शुभम गोंगे, वार्डन मीरा सत्वधन यापैकी कोणीही मला व माझ्या नातेवाईकांना ती मयत झाल्याची माहिती दिली नाही. लीना हिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. या प्रकरणी लिनाचे वडील श्रीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
