वाळुज महानगर, (ता.31) – मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणातील आंदोलकांची उपासमार होऊ नये, म्हणून वाळूज औद्योगिक वसाहतीतील मराठा व्यवसाय संघाने आयशर ट्रकमधून शिदोरी पाठवली आहे.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी शुक्रवार 29 ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. मात्र राज्य सरकारने आंदोलकांची उपासमार व्हावी, त्यांना त्रास व्हावा. म्हणून परिसरातील खाऊ गल्ली बंद ठेवली. त्यामुळे अनेक मराठा बांधवांना गैरसोयीचा मोठा सामना करावा लागला. या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मात्र सरकारने आरक्षण देण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. परिणामी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.
असा निर्णय आंदोलनकांनी घेतला आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून तसेच आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकाची उपासमार होऊ नये, म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील वाळुज एमआयडीसीतील मराठा व्यवसाय संघाने आयशर ट्रक मध्ये पिण्याच्या पाण्यासह शिदोरी पाठवली आहे. शिदोरी घेऊन हा आयशर ट्रक रविवारी 31 ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना झाला.
यावेळी प्रामुख्याने मराठा व्यवसाय संघाचे उद्योजक डॉ. शिवाजी कान्हेरे, मराठवाडा विभाग प्रमुख नरसिंग चव्हाण पाटील, शहराध्यक्ष विष्णू काळे पाटील, वाळुज शहर प्रमुख गोकुळ कराळे पाटील, ज्ञानेश्वर सुकासे पाटील, राम पाटील शेळके, गणेश काळवंडे, भागवत माथनकर, विजेता कोरडे, राहुल कोरडे, किशोर आंबट पाटील, सुभाष राजकुडे पाटील, आप्पासाहेब कपासे पाटील, विनोद पाटील पाठे, तात्यासाहेब चेडे पाटील आदींची उपस्थिती होती.
