March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – वाहतुकीचे नियम न पाळता बस चालवल्याने खाजगी इंग्लिश स्कूलची बस व मनपाची शहर बस यांच्यात अपघात झाला. या अपघातात स्कूल बस मधील तीन विद्यार्थी व शहर बसमधील एक प्रवासी व वाहक मिळून पाच जण जखमी झाले. हा अपघात बजाजनगर येथील स्टरलाईट कंपनीसमोर सोमवारी (ता.24) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास झाला.


छत्रपती संभाजीमहानगर महापालिकेची शहर बस (एम एच 20, ईएल -0279) ही जोगेश्वरी येथून टी पाईंंट मार्ग चिकलठाणकडे जात होती. तर पोद्दार इंग्लीश शाळेची स्कुल बस (एम एच 20, जी सी -0997) ही शाळतुन विद्यार्थीना बजाजनगर येथे घरी सोडण्यासाठी स्टरलाईल कंपनी समोरुन वळण घेत होती. या दोन्ही बसच्या चालकाने वाहतुकीच्या कोणतेही नियम पालन न करता निष्काळजी पणाने बस चालवल्यामुळे दोन्ही बसमध्ये अपघात झाला. या अपघातात स्कुल बसमधील विराज माने, शिवांश यादव, स्वाराज देशमुख हे तीन चिमुकले विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. तर अन्य 15 ते 16 विद्यार्थी घाबारुन कावरेबावरे झाले होते. तसेच मनपाच्या शहर बसमधील सुमारे 15 प्रवाशांपैकी दरवाजाजवळ असलेला एक प्रवासी दरवाजातुन खाली पडून जखमी झाला. तर त्याच बसचा वाहक कृष्णा बोडखे हा बोनटवर पडल्याने कंबरेला मार लागल्याने जखमी झाला. सुदैवाने बस चालक गजानन मुळे हा या अपघातातून बालंबाल बचावला. मात्र या अपघात शहर बसच्या समोरील बाजूच्या काच फुटली. दर्शनी भागाचे मोेठे नुकसान झाले. अपघातची माहिती मिळताच वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोउपनि दिनेश बन, पोलीस हवालदार यशंवत गोबाडे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.

अपघातस्थळी विद्यार्थ्यांची रडारड –
अचानपणे झालेल्या या अपघातामुळे स्कुल बसमधील लहाण मुले घाबरली. त्यामुळे ती मोठ्याने रडायला लागली होती. दरम्यान अपघातस्थळी मोठा जमाव जमला. बजाजनगर येथील समाजिक कार्यक्राते दिनेश दुधाट यांनी स्कुल बसच्या चालकासह जखमी मुलांना जवळच्या एका खाजगी रुग्णालायात दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच वडगाव कोल्हाटी- बजाजनगरच्या उपसरपंच ज्याती साळे, श्रीकांत साळे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत विद्यार्थीची विचारपुस करत धिर दिला.

          पालकांची दवाखान्यात धाव –
अपघात घडल्याची माहिती मिळतात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांच्या पालकांनी रुग्णालयात भाव घेतली. त्यामुळे तेथे गर्दी झाली होती. मात्र तोपर्यंत विद्यार्थ्यांवर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू होते. सुदैवाने या अपघात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. आपले पाल्य सुरक्षित पाहुन पालकांनी सुटकेचा श्वास सोडला.

               बस मध्ये काचांचा सडा –
या अपघातात बसच्या काचा फुटल्याने त्या घुसल्या आणि विद्यार्थी जखमी झाले. बस मध्ये जखमी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या दप्तर व काचांचा सडा पडला होता. या अपघातामुळे अनेक विद्यार्थी घाबरल्याने रडारड सुरू होती.

शाळेच्या नियमाची पायमल्ली –
ज्या स्कूल बस चा अपघात झाला त्या स्कूल चालकाकडून किंवा स्कूल प्रशासनाकडून नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले. बस आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काचेच्या बाहेरून जाळ्या असणे आवश्यक असतानाही त्या नसल्याने काचा फुटून विद्यार्थी जखमी झाले. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

चालकांचा परस्परांवर आरोप –
या अपघात झालेल्या मनपाच्या शहर बस चालकाने व पोतदार इंग्लिश स्कूलच्या बस चालकाने माझी काही चुकी नाही. समोरच्या बस चालकाची चूक आहे. असे म्हणत एकमेकांवर बोट दाखवत आरोप केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *