
वाळूजमहानगर, (ता.4) – भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीला दीर्घ इतिहास आहे. जपान जगातील तिसऱ्या क्रमांकाचे अर्थव्यवस्था असून भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश आहे. या परस्परपूरक परिस्थितीमुळे भारतातील युवकांना जपानमध्ये शिक्षण तसेच नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन मराठवाडा आटो क्लस्टरचे केंद्रप्रमुख सुदर्शन धारूरकर यांनी दीक्षा जापनीज क्लासेसच्या तिसऱ्या वर्धापन दिनी बोलताना व्यक्त केले.

जपान मधील उद्योगांना कुशलआणि संस्कारक्षम युवकांची आवश्यकता असून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती कायम राखण्यासाठी भारत आणि जपान सरकार परस्पर सहकार्याच्या माध्यमातून अनेक योजनांवर कार्य करत आहे. भारत ही जगातील पाचवी अर्थव्यवस्था असून जपान भारतात मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडोर, अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन अशा अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्पांना आर्थिक तसेच तांत्रिक सहाय्य करीत आहे. जपानमध्ये शिक्षण तसेच नोकरी करण्यासाठी जापनीज भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असून दीक्षा जापनीज क्लासेसच्या वतीने वाळूज सारख्या ग्रामीण भागामध्ये करत असलेल्या प्रयत्नाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
प्रारंभी दीक्षा जापनीज क्लासेसचे संचालक व प्रसिद्ध जापनीज भाषेचे प्रशिक्षक दीपक त्रिभुवन यांनी गेल्या 3 वर्षातील कार्याचा आढावा घेतला. आतापर्यंत सुमारे 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे ज्ञान प्रदान केले असून त्याचे कौतुक भारत जपान फाउंडेशन तर्फे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे वय वर्ष 10 ते 30 अशा युवा वयोगटातील विद्यार्थी जापनीजचे प्रशिक्षण घेत आहेत. भारत-जपान सरकारतर्फे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचा युवकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान त्यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेच्या संचालिका उषा त्रिभुवन, दीक्षा त्रिभुवन यांच्यासह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
