
वाळूज महानगर, (ता 3) – आजच्या युगात भगवंताची भक्ती करण्यासाठी अनेक प्रकारच्या भक्ती साधना आहेत. परंतु या सर्व भक्ती साधनेत भगवंताचे नामस्मरण करणे ही सर्वातसोपी भक्ती साधना आहे. तसेच नामस्मरणाची भाषा ही सुलभ असते व शब्द ही सोपे असतात. त्यामुळेच सोप्या भाषेत ‘हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा….. हा सोप्या भाषेतील सहज मुखोदगत होणारा हरिपाठ आपण दररोज नित्य नेमाने करत असतो. त्यामुळे मानव जन्मात आपण सर्वांनी भगवंताचे नित्य नाम स्मरण केलेच पाहिजे. असे मत भागवताचार्य ह भ प गोरक्षनाथ महाराज भिलारे कोळवाडी जिल्हा बीड यांनी व्यक्त केले.

वाळूज महानगरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या कीर्तन मंडपात शुक्रवारी 3 ऑक्टोंबर रोजी पांशाकुशा एकादशीच्या पावन पर्वावर सकाळी ह. भ. प. गोरक्षनाथ महाराज यांचे कीर्तन झाले. याप्रसंगी भिलारे महाराजांनी जगत्गुरू संत तुकाराम महाराजांचा
भक्ती पाले दीन वोवत्सले/
विठ्ठल कृष्णे होसी माये//१//
पडिला विसर माझा काय गुणे/
कपाळ उणे काय करू//२//
तुका म्हणे माझे जालि संचित/
करी वो उचित भेटी //३//
हा तीन चरणांचा अभंग निरुपणासाठी घेतला होता. एकादशी निमित्त पहाटे भालेराव मालुसरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीस महाभिषेक करण्यात आला. तसेच पहाटे 4 ते 6 काकडा, भजन, आरती करण्यात आली.
वाळूज महानगरातील जितेंद्र मालुसरे यांच्या हस्ते सपत्नीक संत पूजन करण्यात येऊन उपस्थित भाविकांना साबुदाणा खिचडीचे वितरण करण्यात आले. कीर्तन सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव आप्पासाहेब झळके, गायनाचार्य- संतोष महाराज कांबळे, हरीकिसन महाराज, मृदुंगाचार्य – अभय महाराज कोकाट, गव्हाणे महाराज, सिद्धेश्वर महाराज, भागवत महाराज, दत्ता महाराज, गायकवाड महाराज, देशमाने महाराज, भगवान महाराज, काकासाहेब महाराज फांदाडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. किर्तन सोहळ्या प्रसंगी वळदगाव, पंढरपूर, बजाजनगर, पाटोदा, गंगापूर (ने), वाळूज, बकवालनगर, जोगेश्वरी, रांजणगाव, विटावा, घाणेगाव, करोडी, लिंबे जळगाव यासह अनेक गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
