
वाळूजमहानगर, (ता.7) – घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईतील सीएसटीसह कुर्ला, दादर येथे बाॅम्बलास्ट होणार असल्याची खोटी माहिती देणार्या एका आरोपीला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी (ता.7) रोजी पहाटे अटक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुंबईतील कुर्ला, सीएसटी, दादर येथे बाॅम्बलास्ट होणार आहे. ते बाॅम्बलास्ट घोडबंदर गुजरातमार्गे मुंबईत होणार, अशी खोटी माहिती 112 वर काॅल करून मुंबई कंट्रोल रूमला दिली. खळबळ उडवून देणार्या या फोननंतर मुंबई कंट्रोलरूमने लोकेशन ट्रेस करून एमआयडीसी वाळूज पोलिसांना दिली. माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे डायल 112 वरील कर्मचार्यांनी रांजणगाव (शेणपूंजी) येथील दत्तनगर रोडवरील रऊफ चाचा बांगडीवाले यांच्या घरात किरायाने राहत असलेल्या डोळेपांघरा ता. लोणार जि. बुलढाणा येथील पंजाब शिवानंद थोरवे (वय 33) याची चौकशी केली. यावेळी पंजाब याने त्याच्या मोबाईलवरून इमर्जन्सीवर काॅल करून हिंदु – मुस्लिम धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करून मुंबईतील सीएसटीसह कुर्ला, दादर येथे बाॅम्बलास्ट होणार असल्याची खोटी माहिती दिल्याचे निष्पण झाले. याप्रकरणी पोलीस शिपाई युसुफ ईब्राहीम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहेत.
