
वाळूज महानगर, (ता.27)- तुर्काबादकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या एसटी बसने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला बसच्या चाकाखाली चिरडून ठार झाली. हा अपघात शुक्रवारी (ता.26) जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास वाळूजजवळ झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तुर्काबाद (खराडी) येथील सुरेश बाबुराव डांगरे व त्यांची पत्नी सुवर्णा सुरेश डांगरे हे दोघे गावोगावी जाऊन बांगडया भरण्याचा व्यवसाय करतात. शुक्रवारी (ता.26) रोजी सकाळी सुरेश हा त्याच्या स्वतःच्या दुचाकीवर व त्याची पत्नी सुवर्णा सुरेश डांगरे ही नारायण शेळके याच्या (एमएच 20, ई व्ही-1890) दुचाकीवर बसुन बजाजनगर येथे बांगड्या भरण्यासाठी जात होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या एस टी बस (एम एच 20, बी एल-3895) ने शेळके यांच्या दुचाकीला धडक दिली. वाळूजपासून काही अंतरावर असलेल्या शिवराई फाट्याजवळ अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर रोडवर 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात सुवर्णा डांगरे या बसच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. या प्रकरणी चंद्रकांत जनार्धन डांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बस चालक निलेश महादेव बुंदे याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण जाधव करीत आहे.
