वाळूजमहानगर, (ता.27) – पुण्याहून औरंगाबादकडे भरधाव येणारी विजयानंद खाजगी टॅव्हल बस समोरील खुराणा ट्रॅव्हलच्या बसला धडकल्याने झालेल्या अपघातात विजयानंद ट्रॅव्हल बसमधील चालक व तीन प्रवासी जखमी झाले. शिवाय बसच्या समोरील बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. ही अपघाताची घटना गुरुवारी (ता.26) रोजी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास वाळूज येथे घडली.
या अपघाताबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कनार्टकातील विजयानंद ट्रॅव्हल प्रा.लि. ही खाजगी प्रवासी वाहतुक करणारी बस (एम एच 12, टी व्ही-1657) ही पुण्याहून 30 प्रवासी घेऊन औरंगाबाद मार्गाने नागपूरला जात होती. या बसच्या पुढे खुराणा ट्रॅव्हलची बस होती. या दोन्ही बस एका पाठोपाठ पुण्याहून औरंगाबादकडे भरधाव येत होत्या. वाळुजजवळ येताच गतीरोधकामुळे समोरील खुरांना ट्रॅव्हलच्या बसने अचानक ब्रेक लावले. त्यामुळे पाठीमागील विजयानंद ट्रॅव्हल कर्नाटकची बस समोरील बसला पाठीमागून जोरात धडकली. गुरुवारी (ता.26) रोजी भल्या पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर भरधाव असलेली बस ( एम एच 12, टी व्ही-1657) ही रस्ता दुभाजकाला धडकून रोडलगत असलेल्या विद्युत खांबावर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील साखर झोपेत असलेले जयेश (पुर्ण नाव माहित नाही), लता मिंधधर, सालोख मिंधधर व चालक फकीर रेड्डी चाकलब्बी हे चार जण जखमी झाले. या अपघातानंतर समोरील खाजगी बसचा चालक घटनास्थळी न थांबता बससह निघुन गेला. या अपघातात बसचे समोरील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी भरधाव व निष्काळजीपणे तसेच सुरक्षित अंतर न ठेवता बस चालवून अपघातास कारणीभुत ठरल्याप्रकरणी फकीररेड्डी चाकलब्बी (रा.कनार्टक) याच्या विरुध्द वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सखाराम दिलवाले करीत आहेत.
