वाळुज महानगर (ता.27) – बजाजनगर येथे शनिवारी व रविवारी छटपूजेचे आयोजन करण्यात आले असून यात हजारो महिला व पुरुष सहभागी होणार आहे. या छट पुजेसाठी पाण्याच्या हौदासह इतर सोयी, सुविधांची पूर्ण तयारी झाली असल्याचे रामलीला मैदानचे संस्थापक तथा उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर के सिंग यांनी सांगितले.
छट माता ही उत्तर भारतीयांची आराध्य देवता आहे. त्यामुळे बजाजनगर येथील रामलीला मैदानावर उत्तर भारतीयांच्या वतीने प्रत्येक वर्षी छटपूजा करण्यात येते. दोन दिवस चालणारी ही छटपूजा शनिवारी (ता.29) रोजी सायंकाळी मावळत्या सूर्याला अर्ध देऊन व रविवारी (ता.30) रोजी सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करून छटपूजेचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
ही छटपूजा साजरी करण्यासाठी प्रामुख्याने वाहती नदी किंवा पाण्याचा हौद अत्यावश्यक असतो. या पाण्यात उभे राहून सूर्याची मनोभावे आराधना केली जाते. सर्वांना सुखी ठेव, सर्वांचं भलंकर. अशी प्रार्थना उत्तर भारतीयांच्या वतीने बजाजनगर येथे गेल्या वीस वर्षापासून छटपूजेच्या माध्यमातून केली जाते.
सुमारे 1995 मध्ये बजाजनगर येथे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील उत्तर भारतीय वाळूज औद्योगिक वसाहतीत कामगार व उद्योग धंदा करण्यासाठी आले होते. या सर्वांनी एकत्र येत बजाजनगर येथे उद्योजक आर के सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रामलीला मैदान व उत्तर भारतीय संघाची स्थापना केली. या माध्यमातून बजाजनगर येथे प्रत्येक वर्षी घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रामलीला कार्यक्रम होऊन शेवटच्या दिवशी रावण दहन केल्या जाते. त्याचप्रमाणे इतर पारंपारिक सण उत्सवास चट पूजा ही मोठ्या आनंदात व उत्साहात साजरी करण्यात येते.
प्रथम बोटावर मोजण्या इतकी ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रामलीला मैदानावर प्रथम 15 ते 20 जणांना छटपूजा करण्यासाठी एक हाऊद बांधण्यात आला होता. त्यानंतर सुमारे 7 ते 8 वर्षानंतर दुसरा हौद बांधण्यात आला. मात्र येथे उत्तर भारतीयांची संख्या 15 ते 20 हजाराच्यावर पोहोचली आहे. त्यामुळे छटपूजा करण्यासाठी बांधण्यात आलेले दोन्हीही हौद अपुरे पडू लागले. त्यामुळे आर के सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक हौद यावर्षी नव्याने बांधण्यात आला. शिवाय छट पूजेसाठी इतर सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
अत्याधुनिक ग्रंथालय उभारणार –
वाळुज औद्योगिक वसाहतीतील उत्तर भारतीय संघाच्या वतीने बजाजनगर येथील रामलीला मैदानावर वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवल्या जाते. यासाठी एक रुपयाही वर्गणी जमा केली जात नाही.
उत्तर भारतीयांच्या कमाईतील 10 टक्के रक्कम या सामाजिक उपक्रमासाठी खर्च केल्या जाते. येत्या काळात बजाजनगर येथील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत अभ्यासासाठी अत्याधुनिक व भव्य ई- ग्रंथालय उभारण्याचा आमचा मानस असल्याचे उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर के सिंग म्हणाले.
