March 27, 2026


वाळुज महानगर, (ता.22) – बजाजनगरातील कोलगेट चौकाजवळील रस्त्यावर एका 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने वाळूज महानगर परिसरात खळबळ उडाली. रविवारी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास समोर आलेल्या या घटनेतील तरुणाचा अति मद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 

याबाबत काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा तरुण बराच वेळ रस्त्यावर निपचित अवस्थेत पडलेला होता. तो हलचाल करीत नसल्याचे लक्षात येताच काही जागरूक नागरिकांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळविले. माहिती मिळताच पोलीस अंमलदार किशोर गाडे आणि सुरज जाधव घटनास्थळी दाखल झाले व तातडीने तरुणाला रुग्णवाहिकेतून शासकीय घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तरुणाला मृत घोषित केले. मृत तरुणाची ओळख उमेश वायाळ (वय 28, रा. बजाजनगर) अशी पटली आहे. तो भाऊ नरेश वायाळ याच्यासोबत वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश वायाळ याने रविवारी कोलगेट चौक परिसरातील काही अवैध दारू विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात मद्य खरेदी करून सेवन केले होते. अति मद्यसेवनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

उमेश वायाळ हा सुशिक्षित तरुण होता, मात्र व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे त्याचा अकाली मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. नागरिकांमध्ये “उमेश वायाळचा बळी बनावट दारू (विषारी) मुळे गेला काय?” अशी चर्चा रंगू लागली आहे.

    अवैध दारू विक्रीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह –

एमआयडीसी वाळूज परिसरातील कोलगेट चौक तसेच महाराणा प्रताप चौकात मोठ्या प्रमाणावर अवैध देशी दारू विक्रीचा उघडउघड व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे बनावट किंवा मुदत बाह्य दारूची बेसुमार विक्री होत असल्याने तरुणाई मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होत आहे. या सर्व परिस्थितीकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासनाचे साप दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

कठोर कारवाई करावी –
नागरिकांच्या मते, अशा घटनांना आळा घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तसेच पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून अवैध दारूच्या दुकाने बंद करावी, अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडण्याची शक्यता आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *