पोलिसाला धक्काबुक्की,
सिडको वाळूज महानगरातील प्रकार
वाळूजमहानगर – गुन्ह्यातील साक्षीदार व आरोपींना न्यायालयाकडून निघणारे समन्स तामील करण्याची गेलेल्या वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या एका पोलिसाला धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना सोमवारी (ता.22) रोजी वाळूज एमआयडीसी सिडको वाळूज महानगर येथे घडली.
वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संतोष गिरजाराम वाघ हे सोमवारी (ता.22) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास सिडको ग्रोथसेंटर, वाळूज महानगर-1 येथील आरोपी श्रीपाल देवकरण कावडीया याचे समन्स तामील यासाठी गेले असता तेथील कुशल देवकरण कावडीया (29) याने येथे कोणी श्रीपाल कावडीया रहात नाही, तुम्ही ईथे कसे आलात, आम्ही चोर आहोत का ?, ईथून निघून जा, असे रागात म्हणत संतोष वाघ यांना दरवाज्यापासून धक्का-बुक्की करून लोटून गेटच्या बाहेर काढले व तुला मी सोडणार नाही, तुझी तक्रार मी करेल, अशी धमकी दिली. याप्रकरणी संतोष वाघ यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी कुशल देवकरण कावडीया याच्या विरूध्द कलम 353 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
