वाळूजमहानगर, (ता.23) – मी काय कुणाची बाग कापली? अशी एक म्हण प्रचलित आहे. समाजात राजरोसपणे उच्चारली जाणारी ही घटना गुरुवारी (ता.22) रोजी सकाळी करोडी येथे उघडकीस आली. परिपक्व फळांनी लगडलेल्या पपई या फळांची बाग अज्ञात व्यक्तीने तोडून लाखो रुपयांचे नुकसान केल्याने अहवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी पोलिसात धाव घेतली आहे. ही घटना निवडणुकीत मिळालेल्या अपयशाच्या कारणावरून घडल्याची दाट शक्यता आहे.
या विषयी मिळालेल्या माहितीनुसार रामभाऊ धोंडिबा दवंडे (रा. करोडी ) यांची करोडी शिवारातील गट क्रमांक 85 मध्ये 7 एकर शेत जमीन आहे. यातील एका एकर जमिनीमध्ये दवंडे यांनी आठ महिन्यांपूर्वी जवळजवळ 700 झाडांची पपईची बाग लावली होती. शेती उत्पन्नावर अवलंबून असलेल्या या शेतकऱ्याने काबाडकष्ट करून पपईच्या झाडांची देखभाल केली. यामुळे या झाडांना मोठ्या प्रमाणात पपय्या लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र अज्ञाताने रात्रीच्या सुमारास धारदार वस्तूने रामभाऊ यांच्या शेतातील परिपक्व झालेली जवळजवळ 350 पपईची झाडे तोडून टाकली. गुरुवारी (ता.22) सकाळी ही घटना उघडकीस आली. यात शेतकऱ्यांचे जवळपास दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक विवंचनेने हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेत मांडली.
निकाल येताच केले नुकसान –
करोडी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रामभाऊ दवंडे यांची सून सोनाली दवंडे या वॉर्ड क्रमांक 1 मधून निवडून आली. या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी रामभाऊ दवंडे यांच्या शेतातील पपईची बाग तोडून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले.
निवडणूकीवरून घटनेचा संशय –
करोडी ग्रामपंचायतची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. या निवडणुकीत दोन पॅनल उभे होते. त्यातील सर्व धर्म समभाव पॅनलच्या उमेदवार म्हणून दवंडे यांच्या सुनबाई उभ्या होत्या. त्या निवडून आल्या. निवडणुकीचा निकाल येताच दवंडे यांच्या पपईची बाग तोडून टाकली. त्यामुळे निवडणुकीच्या कारणावरूनच हा प्रकार घडला असावा. अशी दाट शक्यता आहे.
