February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ) च्या जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो-2023’ चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शिवाय या उद्घाटनास मुख्यमंत्री (महाराष्ट्र शासन) एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील ‘मुख्य अतिथि’ म्हणून उपस्थिती राहणार आहे.

मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर (मसिआ ) संघटना दर तीन वर्षानी ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो’ हे औद्योगिक प्रदर्शन भरवते. यावेळी हे प्रदर्शन येत्या 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान ऑरिक (डीएमआयसी) शेंद्रा येथे आयोजित करण्यात आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो-2023’ चे उद्घाटन करणार असल्याचे मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती निश्चित असल्याचे जगताप यांनी सांगितले.
यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो-2023’ चे प्रमुख उद्घाटक म्हणून निमंत्रण स्वीकारावे. यासाठी वित्त आणि नियोजन राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या मार्गदर्शनाखाली मसिआच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र सोमवारी (ता.26) रोजी नागपूर येथे भेट घेवून आग्रहपूर्वक पाठपुरावा केला. शिवाय काही दिवसांपूर्वी मसिआच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे जाऊन पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क देखील केला होता. मंगळवारी (ता. 27) रोजी पंतप्रधान कार्यालयाकडून देखील होकार मिळाला असून 5 जानेवारी 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो-2023’ चे उद्घाटन करणार असल्याने मसिआ टीममध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे जगताप यांनी सांगितले.
प्रदर्शनाबरोबर डीएमआयसी पाहता येईल
‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो-2023’ हे प्रदर्शन (डीएमआयसी) शेंद्रा येथे होणार असून, देश विदेशातील गुंतवणूकदारांना डीएमआयसी प्रत्यक्ष पाहता यावी. म्हणून या प्रदर्शनासाठी यावेळी ऑरिकचे स्थळ निवडण्यात आल्याचे अध्यक्ष किरण जगताप यांनी सांगितले.
आणखी जबाबदारी वाढली
यामध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. प्रदर्शनाला मोठ्या संख्येने गुंतवणूकदार, प्रदर्शक आणि दर्शक भेट देतात. अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपोच्या माध्यमातून मराठवाड्यात गुंतवणुकीसाठीही फायदा होणार असून, मराठवाडा आणि औरंगाबाद औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रमोट करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो-2023’ चे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभल्याने संघटनेची जबाबदारी आणखी वाढल्याचे मत किरण जगताप यांनी व्यक्त केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *