
वाळूजमहानगर, (ता.15) – सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे जातीय द्वेष भावनेतून वर्ष 2022 च्या विद्यार्थ्यांना 2023 चा जीआर वापर करून त्यांना फेलोशिप व शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याचा आरोप करत राज्यातील व देशातील चालू घडामोडी विरोधात पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पंढरपूर येथील तिरंगा चौकात शुक्रवारी (ता.15) रोजी निदर्शने करण्यात आली.
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, बार्टी ही संस्था अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी असून 773 विद्यार्थी संशोधक उद्याचे देशाचे भविष्य आहे. मात्र सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे जातीय द्वेष भावनेतून वर्ष 2022 च्या विद्यार्थ्यांना 2023 चा जीआर वापर करून त्यांना फेलोशिप व शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. म्हणून या विद्यार्थ्यांचे 173 दिवसापासून आंदोलन चालू आहे. त्याची शासनाने कोणतीही दखल घेतली नाही. सरसकट अवॉर्ड लेटर देऊन एका महिन्याच्या आत फेलोशिपची सरसकट रक्कम त्वरित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी, जातीय द्वेष भावनेतून पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, घटना बदलण्याची भाषा करणारा खासदार अनंत हेगडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खासदारकी रद्द करण्यात यावी. अशा विविध मागण्यांसाठी पँथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील तिरंगा चौक येथे निदर्शने करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विजय दिवेकर, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ महापुरे, सर्जेराव मनोरे, साहेबराव नवतुरे, किशोर जाधव, रंजीत साळवे, महेंद्र वाघमारे, नारायण हिवाळे, राकेश साबळे, किरण डोळस, सचिन मोरे, सुभाष मोरे, बाळू पवार, लता थोरात, संगीता सोनवणे फुलाबाई तीनगोटे आदींची यावेळी उपस्थिती होती.
