वाळूज महानगर, (ता.23) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील न्यू शहीद भगतसिंह विद्यालयात संस्थेचे संस्थापक तथा माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार व स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन मंगळवारी (ता.20) रोजी करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंके यांची तर मुख्य मार्गदर्शक विठ्ठल कांगणे, माजी सैनिक नानासाहेब हरकळ व प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव हर्षित हरकळ, कोषाध्यक्ष अक्षय हरकळ, प्रभारी मुख्याध्यापक इस्माईल शेख, प्राचार्य संगीता सोनवणे यांची विचार मंचावर उपस्थिती होती.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते शहीद भगतसिंह यांचे प्रतिमा पूजन करून माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा झाला व तदनंतर वाळूज परिसरातील दहावी बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विठ्ठल कांगणे यांनी आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुण किती मिळाले हे महत्त्वाचे नसून ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हे महत्त्वाचे नसून जिथे करिअर करायचे त्या क्षेत्राची आवड निर्माण करणे महत्त्वाचे आहे असे मार्गदर्शन केले. माजी सैनिक नानासाहेब हरकळ यांनी उपस्थितांना संबोधित करताना क्षेत्र कुठलेही निवडा आणि त्या क्षेत्रात करिअर करत असताना आई-वडील, समाज आणि देशाची सेवा करायला विसरू नका असे आवाहन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका भारती साळुंखे यांनी नानासाहेब हरकळ व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष आहेर यांनी तर आभार किरण निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


