वाळूज महानगर – रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याबाबत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाळूज ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वाळूज येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत वाळूज येथील भाजपा पदाधिकारी अशोक हरिचंद्र काकडे यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, वाळुज येथील माझ्या घराच्या पुर्वेस सरकारी रस्ता 30 फुटाचा आहे. या रस्त्यावर कैलास भाग्यवंत याने अतिक्रमण केले असून त्याला वाळूज ग्रामपंचायतने नमुना नं. 8 दिला आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणामुळे या रस्त्यातुन साधी रिक्षासुध्दा जात नाही. याबाबत काकडे यांनी ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यांच्याकडे चौकशी केली. तसेच अतिक्रमण धारकावर कार्यवाही करून सरकारी रस्ता मोकळा करून देण्यात यावा. अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायतने कोणतीही दखल न घेतल्याने काकडे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर दिवाणी न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. मात्र तरीही वाळूज ग्रामपंचायतने अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला नसल्याने अशोक काकडे यांनी पुन्हा
विभागीय आयुक्ताकडे धाव घेत वाळूज ग्रामपंचायतने दिवाणी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
———————
