वाळूजमहानगर, (ता.16) – न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून गैर कायद्याची मंडळी जमा करून सामाजिक शांततेचा भंग करत जमिनीवर ताबा मिळवण्याच्या वादातून 20 वर्ष जुनी परिपक्व अशी पाच लाखाची झाडे तोडून व दीड लाखाचे तार कंपाऊंड तोडून अतिक्रमण करणाऱ्या बजाजनगर येथील गरुड झेप कॅरिअर अकॅडमीच्या संचालकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध बुधवारी (ता.14) डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तिसगाव येथील भागीनाथ साळे यांची तिसगाव शिवारातील गट नंबर 150 मध्ये 1 हेक्टर 76 आर वडिलोपार्जित जमीन आहे. त्यामध्ये जवळपास 1 हेक्टर क्षेत्रामध्ये आंबा, नारळ, लिंबुचे झाडे आहेत. त्यांच्या शेजारील गट नंबर 146 मध्ये 12 एकर 34 आर जमीन चंद्रप्रभा झंवर यांची आहे. झंवर यांनी 2017 मध्ये क्षेत्र वाढवून 14 एकरचे रेखांकन मंजूर केले होते. त्यावेळी भागीनाथ साळे यांनी त्यावर आक्षेप घेत सिडको कार्यालयाला चुकीचे रेखांकन मंजुर करु नये, याबाबत लेखी तक्रार दिली होती. त्यानंतर चंद्रप्रभा झंवर यांनी रेखांकन मंजुर करून त्यातील प्लॉट नंबर 63 ते 69, 104 व 112 साळे यांच्या ताब्यात असलेले साहेबराव रामराव सोनवणे व सुरेश साहेबराव सोनवणे यांना विक्री केले. त्यामुळे त्यांचा वाद न्यायालयात गेला. यामध्ये 14 मार्च रोजी न्यायालयाने वादी व प्रतिवादी यांना या जमिनीवर पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारे बदल, विक्री अथवा विकास करणेबाबत मनाई हुकुम दिलेला आहे. असे असतानाही 10 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुरेश सोनवणे, निलेश सोनवणे, राजु झाल्टे व इतर चाळीस ते पन्नास जणांनी जमिनीवरील वीस वर्षापुर्वीचे जुनी नारळ, आंबा, लिंबू व इतर फळांचे झाडे तसेच तार कंपाउंड जेसीबीच्या सहाय्याने तोडुन साळे यांच्या ताब्यातील जमीनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी साळे यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी भागीनाथ साळे यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.14) डिसेंबर रोजी बजाजनगर येथील गरुड झेप कॅरिअर अकॅडमीच्या संचालकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक इंगोले हे करत आहे.
