
वाळूजमहानगर, (ता.1)- घराला कुलूप लावून सासुरवाडीला गेलेल्या एका कुटुंबाचे बंद असलेले घर अज्ञात आरोपींनी फोडून कपाटात ठेवलेले सोन्या, चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम मिळून 1 लाख 68 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना सोमवारी (ता 31) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज औद्योगिक वसाहतीतील कामगार राहुल अशोक कडलक हे पत्नी मुलासह नांदेडा येथे राहतात. रविवारी (ता 30) रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अशोक कडलक हे घराला कुलुप लावून पत्नी, मुलासह सासुरवाडीला शिंंदवाडी ता.गंगापूर येथे गेले होते. जाताना त्यांनी शेजाऱ्याला घराकडे लक्ष ठेवण्याचे सांगितले होते. दरम्यान अज्ञात आरोपींनी अशोक कडलक यांचे बंद घर फोडून कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये रोख, 35 हजार रुपये किमतीचे दोन मनीमंगळसुत्र, 15 हजार रुपये किमतीचे पेंडेट, 30 हजार रुपये किमतीचे कानतले वेल, 35 हजार रुपये किमतीचे मिनी गंंठण, 2 हजार 640 रुपये किमतीचे ओमपान, 1 हजार रुपये किमतीचे जोडवे. तसेच घरासमोर उभी केलेली 10 हजार रुपये किमतीची स्कुटी (एमएच 20, डीजे -2212) असा 1 लाख 68 हजार 640 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. सोमवारी (ता 31) रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेजारी राहणारे कैलास हाकोने यांना चोरीचा संशय आल्याने त्यांनी कडलक यांना फोन करून सांगितले. ही माहिती मिळाताच कडलक तात्काळ घरी येऊन पाहणी केली असता ही चोरीची घटना उघडकीस आली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोउपनि प्रविण पाथरकर करीत आहे. दरम्यान पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.
