
वाळूजमहानगर, (ता.24) – लग्न असल्याने घराला कुलूप लावून मेहंदी काढण्यासाठी गेलेल्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे सेफ्टी लॉक व कडीकोन्डा तोडुन आत प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने अवघ्या दोनच तासात जवळजवळ पाऊण लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. भर दिवसा घडलेली ही घटना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हाडा तिसगाव ता.जि छत्रपती संभाजीनगर येथील बाबासाहेब एकनाथराव जगदाळे वय 47 वर्षे हे एसबीआय बँकेत आर्मी गार्ड म्हणुन काम करतात. 13 मे रोजी सकाळी 10 वाजता ते भाचीचे लग्न असल्याने करंजगाव ता वैजापुर येथे गडंगनेरच्या कार्यक्रमास गावी गेले होते. त्यामुळे घरी पत्नी वनिता, मुलगी समिक्षा व मेहुनीची मुलगी आनु साळुंके असे घरी होत्या. दुपारी 1 वाजेच्या सुमारास त्या मेहंदी काढण्यासाठी घराला कुलुप लावुन बाहेर गेल्या व मेहंदी काढुन 3वाजता परत घरी आल्या असता, अज्ञात चोरट्यांनी घराचे लॉक कट करुन कडी कोन्डा व बेडरुम मधील कपाटातील लॉकर तोडुन कपाटातील 25 हजार रुपये किमतीचे 1 तोळ्याचे सोन्याचे गंठण, 25 हजार रुपये किमतीचे 1 तोळे सोन्याचे मनीमंगळसूत्र, 10 हजार रुपये किमतीचे 6 ग्रॅम सोन्याचे झुंबे, 10 हजार रुपये किमतीचे 4 ग्रॅम सोन्याचे कानातील वेल, 4 हजार रुपये किमतीचे 2 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन नथ तसेच आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड व बँकेचे एटीएम कार्ड असा एकुण 74 हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी बाबासाहेब जगदाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
