वाळूजमहानगर, ता.22) – रस्त्याने पायी जात असलेल्या एका वृद्ध इसमास भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी झालेल्या या अपघातात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मल्लिकार्जुन वाळेकर रा. आर एच /76/10 इंद्रप्रस्त काँलनी बजाजनगर हे वृद्ध 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास वृद्ध पायी जात असताना अम्रपाली बुध्दविहार समोरील रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी समोरून भरधाव आलेल्या दुचाकी (एम एच 20, जी डब्ल्यू – 8747) च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे, भरधाव व हायगईने चालवुन मल्लिकार्जुन यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला, कानाला तसेच दोन्ही पायाला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. विशेष म्हणजे अपघातानंतर दुचाकीस्वार अपघात स्थळी न थांबता पळुन गेला. जखमी छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात बेशुध्द अवस्थेत उपचार घेत आहे. याप्रकरणी सुशांत मल्लिकार्जुन वाळेकर (वय 27) त्याच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.