वाळूजमहानगर, (ता.1)- दुचाकीवर घरी जाणाऱ्या दोन कामगारांना रस्त्यात अडवून आम्हाला दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दे अशी मागणी केली. ती पूर्ण न केल्याने दोन जणांनी शिवीगाळ करत एका 40 वर्ष कामगाराच्या डोक्यात व चेहऱ्यावर बियरची बाटली मारून जखमी केली. ही घटना बजाजनगर येथे शनिवारी (ता 29) रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जखमी कामगारावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साजापूर येथील अनंता रमेश बोरले (वय 40) व त्याचा मित्र संतोष अहिरवार रा. बजाजनगर असे दोघे शनिवारी (ता 29) रोजी कंपनी सुटल्यानंतर वाळूज औद्योगिक वसाहतीतून दुचाकी वरून घरी जात होते. बजाजनगर येथील हर्ष वाईन शॉप समोरून जात असताना त्यांना अभिजीत किशोर फाटे रा. वडगाव (कोल्हाटी) व राहुल अशोक धोत्रे रा. बजाजनगर या दोघानी रात्री 8:15 वाजेच्या सुमारास रस्त्यात अडवले. आम्हाला दारू पिण्यासाठी दोनशे रुपये दे अशी त्यांनी मागणी केली. मात्र पैसे देण्यास अनंता बोरले यांनी नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ सुरू केली. दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेला संतोष अहिरवाल हा तेथून पळून गेला. त्यानंतर आकाशी रंगाचा शर्ट घातलेल्याने बोरले यांच्या डोक्यात बिअरची बॉटल मारली. यावेळी चांगलीच झटापट झाल्याने बोरले याच्या कानाच्यावर पुन्हा बियरची बॉटल मारून जखमी केले. तर पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेल्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. तो गंभीर जखमी झाल्याने हल्लेखोर फरार झाले दरम्यान पळून गेलेला संतोष अहिरराव परत तेथे आला. त्याने फोन करून बोलावल्याने तेथे बबलू आला. आणि दोघांनी अनंता बोरले याला उपचारार्थ बजाजनगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी अभिजीत किशोर फाटे व राहुल अशोक धोत्रे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
