
वाळूज महानगर, (ता.11) – अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती मिळताच दामिनी पथकाने तात्काळ धाव घेतली. त्यामुळे होणारा बालविवाह टळला. हा प्रकार बुधवारी (ता.10) रोजी वाळूज येथे घडला.

याविषयी मिळालेली माहिती अशी की, शक्तीनगर, वाळूज येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह होत असल्याची माहिती दामिनी पथकास मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलीस कॉन्स्टेबल सुभाष मानकर, महिला पोना. सुजाता खरात, गिरीजा आंधळे यांनी लग्नमंडपी धाव घेतली असता त्या ठिकाणी विवाहाची तयारी सुरू होती. यानंतर त्यांनी वधू-वरांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून चौकशी केली असता वधु अल्पवयीन असल्याचे तपासात उघड झाले. मात्र पोलिसांना पाहून वधू-वरांच्या नातेवाईकांनी आम्ही लग्न करत नसून हा साखरपुडा असल्याचा बनाव केला. मात्र नातेवाईकांच्या विचारपूस मध्ये पथकाला खात्री पटली की साखरपुड्यातच हा लग्न सोहळा उरकण्यात येणार होता. यानंतर दामिनी पथकाने दोन्ही कडील नातेवाईकाना वाळूज पोलीस ठाण्यात आणून पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे, वाळूजचे ग्राम विकास अधिकारी उत्तम भोंडवे, उपसरपंच योगेश आरगडे, अंगणवाडी सेविका शिल्पा गवांदे, पोलीस कॉन्स्टेबल अंबिका दारुंटे, आशा कार्यकर्ती अमृता टाके यांच्यासह पथकाने वधू-वरांच्या पालकांना बालविवाह हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे सांगत समुपदेशन केले. वधूच्या पालकांनी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करू. अशी हमी दिली. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले.
