वाळुज महानगर, (ता. 31) – परिसरातील दहेगाव बंगला येथे सुमारे 300 वर्षाची ऐतिहासिक बारव आहे. चिरेबंदी दगडाने बांधलेली ही बारव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधल्याचे गावकरी सांगतात.
विशेष म्हणजे या बारावमधील पाणी गुणकारी होते. परिसरात जर कोणाला विंचू, गोम किंवा तत्सम विषारी कीटक चावला. तर या बारवमधील पाणी त्या ठिकाणी लावल्याने विषाची दाहकता कमी होत असल्याचा दावा येथील नागरिक करतात. परंतु आज ही बारव दुर्लक्षित असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक ठिकाणी बारव बांधल्याचे आजही अस्तित्वात आहे. इतिहासात त्याचे अनेक दाखले ही आहेत. तुर्काबाद परिसरातील दहेगाव (बंगला) येथे अशीच एक ऐतिहासिक चिरेबंदी बारव आहे.
गावाच्या वेशी समोरील हनुमान मंदिराच्या उत्तर बाजूला ही बारव असून त्याची रुंदी अंदाजे 30 फूट व लांबी अंदाजे 50 ते 60 फूट असल्याचे गावकरी सांगतात. दक्षिण बाजूने बारवमध्ये उतरण्यासाठी दगडी आणि कोरीव पायऱ्या आहेत. जमिनीपासून अंदाजे 12 ते 15 फुटाच्या अंतरावर तीन टप्पे या असून ती चौकोनी आकाराची आहे. त्यानंतर अंदाजे 30 फूट खोल कुंडी असून कुंडीच्या पूर्व बाजूने सुरंग सारखे भुयार आहे.
या भुयाराबाबत गावकऱ्यांना पुरेशी माहिती नाही परंतु पाण्याचा उगम बाजूने असावा. असे सांगितल्या जाते. कधी काळी या बारवचे पाणी गावकरी पीत होते. शेजारीच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हौद आणि महिलांना कपडे धुण्यासाठी जागा होती. असेही गावकरी म्हणतात.
विशेष म्हणजे या बारवचा पहिला टप्पा घडवलेल्या दगडाने बांधलेला असून उर्वरित टप्पे अंगचेच आहे. अंगचेच म्हणजेच त्या ठिकाणी दगड होता. हा दगड छन्नी हातोडीने तसेच हंबर च्या सहाय्याने कोरून बारव तयार करण्यात आलेली आहे.
विशेष म्हणजे खाली उतरण्यासाठी अर्ध्या अधिक अंगच्याच पायऱ्या असल्याचे येथील नागरिक सांगतात. या बारवला अद्यापही पाणी आहे, मात्र आज घडीला ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. कारण या बारवमध्ये केरकचरा आणि गाळ साचला आहे. शिवाय परिसरात झाडे, झुडपे वाढली असल्याने परिसराला गलिच्छ स्वरूप आले आहे. या ऐतिहासिक चिरेबंदी बारवचे पाणी 1972 च्या दुष्काळात कमी झाले होते. मात्र ते कधीही आटले नाही. असाही दावा येथील गावकऱ्यांनी केला आहे.
बारवचे पाणी गुणकारी –
दहेगाव (बंगला) येथे चिरेबंदी बारव आहे. त्याच प्रमाणे जवळच मुरमी या गावीसुद्धा एक बार होती. ही बारव सुद्धा अहिल्याबाई होळकर यांनीच बांधल्याचे समजते.

पूर्वी परिसरातील जर एखाद्या व्यक्तीला विंचू, गोम किंवा तत्सम विषारी कीटक चावला. तर या विहिरीचे पाणी त्या ठिकाणी लावल्या जायचे. या पाण्यामुळे विषाची धाहकता कमी होत असे. त्यामुळे हे पाणी गुणकारी होते. असा दावाही येथील नागरिक करतात.
