
वाळूजमहानगर, (ता.12) – घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पत्नी व मुलाने 62 वर्षीय इसमाच्या डोक्यात लाकडी बसण्याचा पाट व दगडी वरंवटा मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. ही घटना गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान जोगेश्वरी झोपडपट्टी येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रभाकर त्रिभुवन वय 62 वर्षे हे पत्नी अनिता व मुलगा दिलीप यांच्यासह जोगेश्वरी झोपडपट्टीत राहत. घरगुती कारणावरुन गुरुवारी (ता.9) रोजी रात्री 11 वाजे दरम्यान प्रभाकर व त्यांची पत्नी अनिता प्रभाकर त्रिभुवन यांचे भांडण झाले. यावेळी अनिता हीने प्रभाकर यांच्या डोक्यात लाकडी बसण्याचा पाट व दगडी वरवंटा डोक्यात मारला. त्यामुळे प्रभाकर हे जमिनीवर जखमी होवुन बेशुद्ध पडले. त्यांना दवाखाण्यात घेवुन जावु दिले नाही. त्यामुळे ते रात्रभर बेशुद्धच होते. बबन त्रिभुवन यांनी प्रभाकर यांना शुक्रवारी (ता.10) रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घाटी घाटी दवाखान्यात दाखल केले. दरम्यान उपचार सुरू असताना रविवारी (ता.12) रोजी सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास प्रभाकर त्रिभुवन हे मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. याप्रकरणी बबन मुरलीधर त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी अनिता प्रभाकर त्रिभुवन व मुलगा दिलीप प्रभाकर त्रिभुवन यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलिसांनी आरोपी पत्नी व मुलगा दोघांनाही अटक केली आहे.
