March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.23)  – शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणारा बैलपोळा तुर्काबाद (खराडी) येथे मोठ्या उत्साहात व हर्ष उल्हासात शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.

तुर्काबाद (खराडी) येथे दरवर्षी दोन वेगवेगळ्या ठिकाणी बैलपोळा भरतो. एक म्हणजे गावाच्या पूर्वेला वाळुज रोडवरील लक्ष्मी माता मंदिरासमोर व दुसरा जिल्हा परिषद शाळेसमोर. लक्ष्मी माता मंदिरासमोर भरणाऱ्या बैलपोळ्याचा मान गढीवरील पटेल कुटुंबाला असतो. तर जिल्हा परिषद शाळेजवळ भरणाऱ्या बैलपोळ्याचा मान पाटेकर कुटुंबाला असतो.

बँड पथकाच्या व डीजेच्या निनादात भव्य मिरवणूक काढून व तोरण तोडून हा बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बैलांची आकर्षक सजावट व रंगरंगोटी करून सुमारे 200 च्यावर बैल व शेतकरी, तरुणवर्ग या बैलपोळ्यात सहभागी झाले होते. लक्ष्मी माता मंदिराजवळील बैलपोळा तोरण तोडून फुटला. तर पाटेकर कुटुंबाचा मान असलेल्या बैलपोळ्याची सुरुवात जिल्हा परिषद शाळेजवळून झाली.

यावेळी डीजेच्या निनादात सजवलेल्या बैलांची भव्य मिरवणूक काढून बैलपोळा मोठ्या उत्साहात व हर्ष उल्हासात साजरा करण्यात आला. ठीक ठिकाणी बैलांना ओवाळत पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून महिलांनी पूजा केली.

दरम्यान सकाळपासूनच शेतकऱ्यांमध्ये या बैलपोळ्याचा उत्साह दिसून येत होता. बैलपोळा अत्यंत शांततेत साजरा करण्यात आला. वाळूज पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *