वाळुज महानगर, (ता.21) – ट्रक, टाटा एस (छोटा हत्ती) व कंटेनर अशा एकापाठोपाठ भरधाव जाणाऱ्या तीन वाहनांमध्ये जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह चालक असे दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी (ता.21) रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बजाज गेट समोर झाला.
याबाबत माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरकडून एक अज्ञात ट्रक वाळूजकडे येत होता. या ट्रकच्या पाठीमागे (छोटा हत्ती) टाटा एस (एम एच 12, एस एक्स -0261) व त्यामागे कंटेनर एन एन 01, ए जी -8498)
होते. हे तिन्हीही वाहने गुरुवारी (ता.21) रोजी दुपारी एका पाठोपाठ भरधाव वाळुजकडे जात होते.
बजाज गेट समोरील वाल्मीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे पाठीमागे असलेले टाटा एस व कंटेनर आणि समोरील ट्रक यांच्यात जोराची धडक झाली. दुपारी 2 वाजेच्या सुमारास झालेल्या या विचित्र अपघातात टाटा एस (छोटा हत्ती) मधील चालक व महिला सहप्रवासी पवार (पूर्ण नाव माहित नाही) रा. जोगेश्वरी असे दोन जण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर समोरील अज्ञात ट्रक निघून गेला. तर पाठीमागे असलेले टाटा एस (छोटा हत्ती) आणि कंटेनर रस्त्यातच अडकून पडले. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्यानुसार अपघातात जखमी झालेल्या छोटा हत्तीच्या चालकास इतर वाहनांच्या चालकांनी बाहेर काढून एका रिक्षातून तात्काळ उपचारात दवाखान्यात रवाना केले. मात्र सह प्रवासी महिला असल्याने तिला कोणीही हात लावला नाही. त्यामुळे ती घटनास्थळीच बराच वेळ पडून होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे पायलट राजू रोकडे आणि डॉक्टर यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी महिला (पवार हिला) उपचारार्थ घाटीत दाखल केले.
दरम्यान वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार केशव इधाटे आणि सुरेश मोरे यांनी अपघातस्थळी येऊन क्रेनच्या मदतीने घातग्रस्त वाहने बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरकडून वाळूज, गंगापूर, नगर, पुणेकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
