March 23, 2026


वाळूजमहानगर, ता.6 – गावातील तरुणांशी असलेले प्रेम संबंध मान्य नसल्याने चुलत भावानेच डोंगरावरून ढकलून देत 17 वर्षीय बहिणीचा खून केला. ही घटना वाळूज परिसरात सोमवारी तास सहा रोजी दुपारी घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नम्रता गणेशराव शेरकर (वय 17 वर्ष 2 महिने) रा. श्रीराम कॉलनी, शहागड ता.अंबड जि. जालना ही तरुणी बारावीच्या वर्गात महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. तीचे वडील पुजापाठ करतात. तिचे गावातील एका तरुणांशी सूत जुळल्याने दोघेही पळून गेले होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी समजावून तिला परत आणले होते. दरम्यान नम्रता हिचे समुपदेशन करण्यासाठी तिला वाळूज परिसरातील वळदगाव येथे तिचे काका तानाजीराव शेरकर यांच्याकडे आणून सोडले होते. दरम्यान तिचे काका व भाऊ नम्रताईचे नेहमी समुपदेशन करत होते. सोमवारी (ता. 6) दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास तीचा चुलतभाऊ ऋषीकेश उर्फ वैभव शेरकर याने दुचाकी (एमएच 20, जीएच -2624) वरून नम्रताला वाळूज परिसरातील सोलापूर धुळे हायवे जवळील खवड्या डोंगरावर घेऊन गेला होता. तेथे तो नम्रताला समजावून सांगत होता. मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे ऋषिकेश उर्फ वैभव याने नम्रताला रागाच्या भरात डोंगरावरून खाली ढकलून दिले.

ती अंदाजे दोनशे फूट उंचावरून खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. ती मृत झाल्याचे समजताच ऋषिकेश याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र तेथील काही दक्ष नागरीकांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यास डोंगराच्या पायथ्यांशी पकडून ठेवत पोलिसांना फोन केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कृष्णा शिंदे, सपोनि संजय गिते,पोउपनि दिनेश बन,पोह बाळसाहेब आंधळे,पोअ राजाभाऊ कोल्हे,मनोज बनसोडे,गोरख वाघ,सुरेश कचे,सुरेश भिसे,राजू चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नम्रताला बेशुध्द अवस्थेत घाटीत दाखल केले असता तीला डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

ऋषिकेशची गुन्हेगारी प्रवृत्ती –
नम्रता हिचा चुलतभाऊ ऋषीकेश उर्फ वैभव हा गुन्हेगारी प्रवृतीचा आहे. त्याच्या विरुध्द सातारा पोलीस ठाण्यात मारामाऱ्या करणे, प्राणघातक हल्ले करणे. असे गुन्हे दाखल असून तो या गुन्ह्यात मध्ये हर्सुल जेलची हवा खावुन आला असल्याची माहिती पोलीसांनी दिली.


जात आडवी आल्याने नम्रताचा खून-
17 वर्षीय तरुणी नम्रता शेरकर व तिचा प्रियकर हे वेगवेगळ्या जातीचे होते. त्यामुळे त्यांच्या लग्नास कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघेही गावातून पळून गेले होते. त्यांना शोधून आणून कुटुंबीयांनी तिचे समुपदेशन केले. मात्र नम्रता ऐकत नसल्याने तिचा ऋषिकेश शेरकर यांनी नम्रताला डोंगरावरून ढकलून देऊन खून केला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *