
वाळूजमहानगर, (ता.26) – थकीत बिल व जीएसटीचे पैसे कंपनीने न भरल्याच्या निषेधार्थ एका ठेकेदाराने उपोषण सुरू केले आहे. मात्र मागण्या मान्य होत नसल्याने स्वाभिमानी पँथर जनरल कामगार संघटनेने मंगळवारी (ता.25) रोजी सकाळी वाळुज औद्योगिक वसाहतीतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी समोर निदर्शने करण्यात आले.
याबाबत स्वाभिमानी पँथर जनरल कामगार संघटनेच्या लेटरहेडवर दिलेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक वसाहतीतील जॉन्सन आणि जॉन्सन या कंपनीने थकित बिल व जि.एस.टी.चे. पैसे भरले नाही. त्यामुळे ठेकेदार अजय यादव हा ब्लॅक लिस्टमध्ये गेला. त्याला कोणतेही काम मिळत नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याच्या मागण्या त्वरीत पूर्ण कराव्यात व थकित बिल देण्यात यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी पँथर जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय दिवेकर, महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ महापुरे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीसमोर तीव्र निदर्षने करण्यात आली. यावेळी अजय यादव, सुनिल मोठे, विजय शिंदे, निखील यादव, सचिन मोरे, सुभाषकुमार मोरे, फुलाबाई तीनगोटे, कुसुमबाई शिरसाट, प्रभावती अमूलिक, उषाबाई निसर्गन, भाग्यश्री बनकर, आम्रपाली कोतकर यांच्यासह कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान या बाबत कंपनीचे विजय गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
