
वाळूजमहानगर, (ता.28) – परीस स्पर्श या संकल्पनेची प्रेरणा घेऊन कवयित्री अलकनंदा घुगे यांच्याकडून काव्यनिर्मितीची प्रक्रिया वडगाव कोल्हाटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता.28) मुलाखत तंत्रातून जाणून घेतली. यावेळी कवीच्या भावविश्वात मुले रमली आणि कविता करण्याच्या टिप्स देखील त्यांनी कवयित्री अलकनंदा यांच्याकडून आत्मसात केल्या.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील प्रथम टप्पा म्हणून निपुण महाराष्ट्र अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांच्या पायाभूत भाषा साक्षरता व अंकज्ञान विकसनावर भर देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या लेखी अभिव्यक्ती विकसनासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून परीस स्पर्श या उपक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी अलकनंदा घुगे यांनी बालपणी गावाजवळील शेत शिवार, मोठ्या कुटुंबातील आजी आजोबा, गावातील वयोवृद्ध मंडळी, अवती भोवतीचे डोंगर, नद्या, सण, उत्सव यातील सूक्ष्म निरीक्षण व ते अनुभव कुणालातरी सांगण्याच्या जिद्दीतून माझ्या कविता जन्माला आल्याचे सांगितले. मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांनी प्रारंभी अलकनंदा घुगे यांचे पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देऊन स्वागत केले. विद्या सोनोने, अनिता राठोड, सोनाली निकम, मंगला गाडेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
