वाळूजमहानगर – वाढत्या चोऱ्या व परिसराच्या तुलनेत कमी असलेले पोलीस बल. यावर तोडगा म्हणून पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज हद्दीतील क्रांतीनगर, वडगांव कोल्हाटी या भागामध्ये “ग्राम सुरक्षा दलाची” स्थापना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बुधवारी (ता.5) रोजी करण्यात आली. यावेळी वाटप करण्यात आलेल्या सुट्टी, काठी या साहित्याचा कसा वापर करावा याचेही मार्गदर्शन करण्यात आले.
वाळुज औद्योगिक वसाहतीमुळे परिसर मोठा झाला असून लोकसंख्याही लाखोच्या घरात आहे. या परिसरात कायदा सुव्यवस्थेसह गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे कार्यरत आहे. मात्र लोकसंख्या व भौगोलिक परिसर पाहता येथील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत तोकडी आहे. परिणामी प्रत्येक ठिकाणी पोलिसांना सुरक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे परिसरात चोऱ्या, माऱ्यासह गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या संख्येत वाढले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली.
ग्राम सुरक्षा दलास प्रशिक्षण –
या ग्राम सुरक्षा दलामध्ये सहभाग नोंदविलेल्या व्यक्तींना टी-शर्ट, लाठी व शिट्टी वाटप करण्यात येऊन त्यांना या वस्तुंचे महत्व समजावुन सांगीतले. तसेच पीटी शिक्षक अंमलदार यांचे मार्फतीने लाठी कशी चालवावी, लाठीपासुन कसा बचाव करावा, रात्रगस्त कशी करावी. याबाबतचे प्रशिक्षणही देण्यात आले.
मार्गदर्शक सूचना
यावेळी क्रांतीनगर भागातील उपस्थित जनसमुदायास “दक्ष नागरिक सुरक्षित परिसर”, “सुजान शेजारी खरा पहारेकरी” या आशयाखाली चोरांपासुन घ्यावयाची खबरदारी, आपण आपले घर व परिसर सोडून जाताना आपले शेजारी व पोलीस ठाणे एमआयडीसी वाळूज येथे आपल्या घराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कळविण्यात यावे व घर व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, दुचाकीस नेहमी व्हील लॉक लावून ठेवावे. महिलांनी फेरीवाल्यांवर विश्वास न ठेवता त्यांचे बाबत नेहमी जागरुक भुमीका घ्यावी, आपले परिसरात एखादी अप्रिय घटना घडत असल्यास किंवा संशयित इसम अथवा वस्तू दिसून आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. अशा मार्गदर्शक सूचना वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी यावेळी केल्या.