March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.2) – ट्रान्सपोर्ट व्यवसायासाठी वापरण्यात येणारा आठ लाख रुपये किमतीचा ट्रक नेहमीप्रमाणे उभा केला असता तो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला खरा मात्र, ट्रक मालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आल्याने जीपीएस सिस्टीमच्या मदतीने ट्रक चोरट्याचा पाठलाग करत त्याला पोलिसांच्या मदतीने मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. हा प्रकार वाळूज औद्योगिक वसाहतीत 1 एप्रिल रोजी रात्री घडला.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर गारखेडा परीसर ता. जि.छत्रपती संभाजीनगर येथील अभिषेक राजेश जाधव वय 25 वर्षे यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांच्या मालकीचे शिवम ट्रान्सपोर्ट सर्विसेसकडे येणाऱ्या मालाची ने-आण करण्यासाठी पांढऱ्या रंगाचा टाटा 1109 (एम एच 21, एक्स -4421) वापरतात. 8 लाख रुपये किंमतीची ही ट्रक नेहमीप्रमाणे ऋचा इंजिनिअरिंग कंपनीच्या सर्विस रोडवर के सेक्टर येथे उभा असते. 1 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास जाधव यांना सुपरवाईझर सचिन साधु सुरवसे यांनी फोनद्वारे कळविले की, टाटा ट्रक 1109 ही ऋचा इंजिनिअरिंग कंपनीच्या सर्विस रोडवर उभा केलेल्या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे जाधव यांनी तात्काळ येऊन त्या ठिकाणी, आजुबाजूच्या परीसरात तसेच वाळुज औद्योगिक भागात शोध घेतला.
जीपीएस प्रणालीमुळे आरोपी जेरबंद –
दरम्यान या ट्रकला लावण्यात आलेल्या जीपीएस सिस्टीमवरून हा ट्रक कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून तो साजापूरच्या दिशेने घेऊन जात असल्याचे लक्षात आले. या सिस्टीमच्या लोकेशन वर जाधव यांनी पाठलाग करत पोलिसांना माहिती दिली. तोपर्यंत जाधव यांनी ट्रकचा पाठलाग सुरूच ठेवला. दरम्यान वाळुज एमआयडीसी पोलिसांनी व अभिषेक जाधव यांनी आठ लाख रुपये किमतीच्या ट्रकसह आरोपीस रंगेहात पकडून जेरबंद केले.

काशिनाथ भिकाजी शिंदे, रा. परळी वैजनाथ ता. परळी जिल्हा बीड (ह मु रांजणगाव, शेणपुंजी) असे ट्रक चोरणाऱ्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *