
वाळूजमहानगर (ता.06) – गोलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गट व ग्रामविकास पॅनलच्या भारती रमेश कणिसे या विजयी झाल्या आहे. या ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलने एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत सरपंचपदासह सर्व 7 जागा पटकवल्या. चार पॅनल मध्ये झालेल्या या निवडणुकीत विरोधकांना एकही जागा मिळवता आली नाही.

गोलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुक रिंगणात एकूण चार पॅनल उतरले होते. येथील सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून सरपंचपदासाठी ग्रामविकास पॅनलच्या भारती रमेश कणिसे, लोकशाही पॅनलच्या रीना जय सलामपुरे, जय श्रीराम जय बजरंग बली ग्रामविकास पॅनलच्या सोनी कपूर कनिसे व आदर्श ग्रामविकास पॅनलच्या विशाखा हुकुमचंद सलामपुरे या चार महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या.
सरपंचपदाच्या निवडणुकीत भारती कणिसे यांनी 352 मते घेऊन विजय मिळवला. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचेच बाबासाहेब धोंडरे, सुनील किर्तीशाही, मच्छिंद्र गिर्हे, प्रतिक्षा खोतकर, अंजली सलामबाद, संगिता सातपुते हे सदस्य विजयी झाले. याच पॅनलच्या दिक्षा सलामपुरे या बिनविरोध निवडुण आल्या आहेत.
विशेष म्हणजे या निवडणुकीत इतर तिन्ही पॅनलला मतदारांनी नाकारल्याने त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही. गोलवाडी ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलने एकहाती सत्ता मिळविल्याने छगन सलामपुरे, राम सलामबाद, रावसाहेब धोंडरे, देवीलाल मुंगसे, ताराचंद किर्तीशाही, केरुबा कसारे व साईनाथ गायकवाड यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
