
वाळूज महानगर (ता.8) – वाळूज परिसरातील नांदेड शिवारात असलेल्या एका पळसाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह शुक्रवारी 7 नोव्हेंबर रोजी आढळून आला. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आंबेगाव ते आंबेलोहळ या रस्त्यावर अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर एक पळसाचे झाड आहे. या झाडापासून टोकी, आंबेलोहळ,नांदेड ही गावे मध्यावर आहेत. अत्यंत सुनसान असलेल्या या परिसरात शेतकऱ्याशिवाय कोणीही भटकत नाही. शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एक शेतकरी तुरीवर फवारणी करण्यासाठी गेला असता त्याला हा इसम पळसाच्या झाडाला दोरीच्या साह्याने लटकलेल्या अवस्थेत दिसला. तो दहा ते बारा दिवसापासून लटकलेल्या अवस्थेत असल्याने त्यातून मोठी दुर्गंधी येत होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार श्वास मुंडे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कुजलेला मृतदेह घाटीत दाखल केला.

खून की आत्महत्या, पोलीस संभ्रमात –
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. मात्र या इसमाची ओळख अद्यापही पटली नाही. विशेष म्हणजे त्याने आत्महत्या केली की, त्याला कोणी फासावर लटकवले. याबाबत काहीही थांगपत्ता लागेना. त्यामुळे पोलीस संभ्रमात सापडले असून वेगवेगळ्या दिशेने तपास करण्यात येत आहे.
