वाळूजमहानगर, (ता.23) – बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीच्या संचालकांनी अपमानास्पद वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने लीना पाटील या 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह विविध संघटनांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.23) रोजी धाव घेत गरुड झेपच्या संचालाकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. मागणीचे निवेदन दिले. यावेळी मोठा जमाव जमला होता.
वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांनी स्वीकारलेल्या या वेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गरुड झेप अकॅडमी मध्ये खेड्यापाड्यातील गरीब शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रशिक्षण घेतात. मात्र विद्यार्थ्यांना संस्था चालकाकडून विविध कारणावरून नेहमी अपमानास्पद वागणूक दिल्या जाते. बऱ्याच वेळा उपाशी ठेवल्या जाते. विद्यार्थी, विद्यार्थिनींना लज्जास्पद वागणूक दिल्या जाते. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केल्या जातो.
संस्था चालकांना राजकीय पाठबळ असल्याने विद्यार्थी सर्व त्रास सहन करतात. मात्र हा त्रास सहन न झाल्याने सुमारे दोन महिन्यापूर्वी श्रीकांत दशरथ वाघ या विद्यार्थ्याने व दोन दिवसापूर्वी लीना श्रीराम पाटील या विद्यार्थिनीने संस्थाचालकांच्या याच त्रासामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्या.
बजाजनगर येथील गरुड झेप अकॅडमीमध्ये यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. संस्था चालकांकडून विद्यार्थ्यांना होणाऱ्या या त्रासाबाबत अनेक विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी आहेत. मात्र संस्था चालकाला राजकीय वरदहस्त असल्यामुळे या आधी गरुड झेप अकॅडमीवर कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. दोन महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.
यापूर्वीही अनेक घटना घडल्या या घटनेस जबाबदारम्हणून गरुड झेप अकॅडमीचे संचालक निलेश सोनवणे, सुरेश सोनवणे, व्यवस्थापक विजय राठोड, शुभम गोंगे, वार्डन मीरा सत्वधर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अशी मागणी गुरूवारी (ता.22) रोजी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनच्या वतीने वडगाव (को.) बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड, छावा युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल काळे, ग्रामपंचायत सदस्य विजय सरकटे, योगेश सोनवणे, राजेश इंगोले, किशोर शिरवत. तसेच याच संदर्भात शुक्रवारी (ता.23) रोजी आदिशक्ती सप्तशृंगी जनाधुन चॅरिटेबल ट्रस्ट, व खांदेश क्लब बजाजनगर यांच्या वतीने मनोहर सनेर, सतिश पाटील, बजरंग पाटील, कांतीलला महाजन, देविदास चौधरी, रविद्र पाटील, कैलास पाटील, किशोर पाटील, किशोर पाटील आदींनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात खांदेशातील मोठा जमाव एकत्र आला होता.
राजकीय वरदहस्त –
विद्यार्थ्यांवर अन्याय व अत्याचार करणाऱ्या गरुड झेप अकॅडमीच्या दोन्ही संचालकांना राजकीय वरदहस्त आहे. त्यातील निलेश सोनवणे हा भाजपा उद्योग आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. तर सुरेश सोनवणे हा भाजपाचाच माजी जिल्हा परिषद सदस्य आहे.
योग्य कारवाई होणारच –
पोलीस कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही. आरोपी फरार होऊन कोठेही गेले तरी त्याला शोधून आणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणारच. असे आश्वासन वाळुज एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अविनाश आघाव यांनी मयत लीना पाटील हिच्या आई-वडिलांसह निवेदन देणाऱ्यांना दिले.
