
वाळुज महानगर, (ता.28) – गणपती बाप्पाचे घरोघरी बुधवारी 27 ऑगस्ट रोजी आगमन झाले. या आगमनाचे वाळूज महानगरात जल्लोषात स्वागत करण्यात आले असून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळाच्या मंडपातही गणराज विराजमान झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यात गणपती बाप्पाची उत्साहात व मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

बजाजनगरातील मोहटादेवी व मोरे चौकात गणेश मूर्ती व सजावटीचे व ढोल ताशांचे अनेक दुकाने थाटण्यात आली होती. दरम्यान मूर्ती व हार फुले, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. यावर्षी मुबलक गणेश मुर्त्या बाजारात उपलब्ध होत्या.

21 फूट उंचीची मूर्ती बजाजनगरात –
बजाजनगरच्या लागूनच असलेल्या देवगिरीनगर, सिडको वाळूज महानगर येथील मैदानात शिवपुत्र प्रतिष्ठानच्या वतीने 21 फूट उंच गणेश मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती मुंबईहून आणण्यात आली. मंगळवारी रात्री या चिंतामणी गणेश मूर्तीची बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
एमआयडिसी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत 22 गावे असून त्यापैकी जोगेश्वरी, नांदेडा, नारायणपूर, घाणेगाव, खोजेवाडी, वडगाव (रामपुरी), या 6 गावात एक गाव एक गणपती या संकल्पने नुसार गावातील एकाच ठिकाणी एकच सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त –
एम आय डी सी वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास शंभर सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. मोठा परिसर असल्यामुळे केंद्रीय राखीव पोलिस दलाची एक तुकडी, पोलिस व होमगार्ड बंदोबस्तासाठी सज्ज झाले आहेत.
डीजेवर बंदी –
पोलिसांनी रविवारी आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील यांनी दिली.
