वाळुज महानगर, (ता.25)- कासोडा येथे
प.पु. गोवत्स राधाकृष्ण स्वामी महाराज, जोधपूर,
गुरुवर्य प.पु. भास्करगिरी महाराज यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहास रविवारी (ता.25) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून भाविकांच्या सुविधेसाठी कासोडा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी चोख व्यवस्था ठेवली आहे.
वाळूज परिसरातील कासोडा येथे गत 25 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी या सप्ताहास 25 वर्ष पुर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी हा रौप्य महोत्सवी सप्ताह यशस्वीपणे पार पडण्यासाठी तीन महिन्यापासून जय्यत तयारी केली होती. या सप्ताहात नामांकित महाराज प्रवचनातुन समाज प्रबोधन करणार असून प्रवचनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.
या सप्ताहात ग्रामस्थांनी श्रमदान करुन सप्ताहाचा परिसर स्वच्छ केला असून जवळजवळ 10 एकर मध्ये भव्य मंडप टाकण्यात आला आहे. महिला व पुरुष भाविकांसाठी शुद्ध पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृह, आजारी भाविकांसाठी तज्ञ डॉक्टर, वाहनाच्या पार्किंगसाठी विस्तीर्ण परीसर आहे. या सप्ताहात आठवडाभर शिरोडी, राजुरा, खोजेवाडी, एकलहेरा, नांदेडा, रामराई, धामोरी, जोगेश्वरी, जळगाव, टेंभापुरी, जिकठाण, शहापुर, बोरगाव, देर्डा, विटावा, आंबेलोहळ, वडगाव, टोकी, तुर्काबाद, आसेगाव, सिध्दपुरवाडी आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सप्ताहात दररोज विविध धार्मिक कार्यक्रम गुरुवर्य प.पु. भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत होणार असून दररोज काकडा भजन, विष्णु सहस्त्र नाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, गाथा भजन श्रीराम जप, हरिपाठ, हरिजागर आदी विविध कार्यक्रमासह दररोज हरिकिर्तनहोणार आहे. यात ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम, ह.भ.प.अनिल महाराज पाटील, ह.भ.प. पांडूरंग महाराज घुले, ह.भ.प.एकनाथ महाराज चत्तरशास्त्री, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वसंतगडकरे यांचा समावेश आहे. या सप्ताहात दररोज सकाळी 9 ते 12 या वेळेत भागवत कथाकार प.पु. गोवत्स राधाकृष्ण स्वामी महाराज, जोधपूर हे कथावाचन करणार आहे. रविवारी (ता.3) ह.भ.प.गुरुवर्य भास्कर गिरी महाराज यांचे उत्तराधिकारी ह.भ.प.स्वामी प्रकाशानंद गिरी महाराज यांचे सकाळी 9 वाजता काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होईल. या धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन कासोडा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
