
वाळुज महानगर, (ता.9) – भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाने अचानक वळण घेतल्याने पाठीमागून येणारी दुचाकी कारवर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील इसारवाडी फाट्याजवळ मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील इसारवाडी फाट्याकडून जाणाऱ्या एका अज्ञात कार चालकाने अचानक सारंगपूरकडे वळण घेतले. त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणारी दुचाकी (एम एच -20, इ यु -1021) कारवर आदळली. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील इसारवाडी फाट्याजवळील सारंगपूर कॉर्नरवर मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 3:10 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील सुनील भागचंद फुलमाळी (वय 35) आणि रामदास फुलमाळी (वय 34) दोघेही रा. मलकापूर, शिरोडी हे गंभीर जखमी झाले. 
अपघाताची माहिती मिळताच इसारवाडी फाटा येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी नाणिजधाम यांच्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना लिंबे जळगाव येथील टोल नाक्या जवळील सीएसएमएसएस हॉस्पिटल येथे दाखल केले.
