वाळूजमहानगर, (ता.19) – भरधाव जाणारी मारुती कार व महामार्गाची दुरुस्ती करणारे ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात होऊन कारचा चेंदामेंदा होऊन चालक जागीच ठार झाला. तर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे दोन्ही चाके निखळून तुकडे झाले. यात ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (ता.19) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरातील एएस क्लब चौकातील उड्डाणपूलाजवळ झाला.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, मारुती कार (एम एच 20, सी एस 0504) चा चालक रोहिदास पाटीलबा उषिर वय 56 रा. ठाकरेनगर एन 2, सांभाजीनगर हा बुधवारी (ता.19) रोजी लासुर स्टेशनकडून सांभाजीनगरकडे येत होता. या कारच्या पुढे लोखंडे अंगल व पत्रे घेऊन ट्रॅक्टर (एम एच 20 जी इ – 1055) चालला होता.
या दोन्ही वाहनांचा दुपारी 3 वाजेच्या सुमारास सोलापूर धुळे महामार्गावरील एएस क्लब चौकातील उड्डाणपूलाजवळ भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भयानक होता की, ट्रॅक्टरच्या ट्रालीचे चाकं निखळून दोन तुकडे झाले तर मारुती कारचा चेंदामेंदा होऊन कारचालकाचा जागीच मृत्यू झाला. 
तो कारमध्येच अडकला. तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत अडकलेल्या मृत कार चालकाला नागरीकांच्या मदतीने बाहेर काढून घाटीत उपचारार्थ दाखल केले. दरम्यान अपघातस्थळी वाहनधारकांसह परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
