वाळूजमहानगर, (ता.5) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी कार्यालयात घुसून एका 31 वर्षीय संस्था चालक व्यवसायिकास मारहाण केली. ही घटना सोमवारी (ता 3) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, म्हारोळा, बिडकीन येथील योगेश नामदेव जाधव (वय 31) त्यांचे स्वास्तिक सिटी येथे वडगाव कोल्हाटी येथे धर्मादाय संस्था ऑल औरंगाबाद संबो असोसिएशनचे कार्यालय आहे. सोमवारी (ता.3) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जाधव हे कार्यालयामध्ये काम करत असतांना उमेश बुजाडे व त्याचे तीन साथीदार कार्यालयात घुसले. त्यांनी जुन्या वादातून वैयक्तिक राग धरून जाधव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कार्यालयातील काचांची तोडफोड करून लॅपटॉप, खुर्च्या आणि टेबलची तोडफोड केली. या मारहाणीत जाधव यांच्या उजव्या हाताला, डाव्या कानाच्या वर डोक्याला व डाव्या मांडीला गंभीर मार लागला. यावेळी झालेल्या झटापटीत जाधव यांच्या हातातील अंगठी गहाळ झाली. याशिवाय कार्यालयातील महत्त्वाच्या साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात उमेश बुजाडे व इतर तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
