February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.20) – वाळूज परिसरातील करोडी ग्रामपंचायत येथे दोन पॅनल मध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सर्जेराव पाटील चव्हाण यांच्या सर्व धर्म समभाव पॅनलने सरपंच पदाच्या उमेदवारासह आठ पैकी सात जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व स्थापन केले. त्यामुळे येथे सुनिता देविदास गवांदे या सरपंचपदी विराजमान होणार आहे.

वाळूज परिसरातील करोडी येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे. नव्याने स्थापन झालेल्या या ग्रामपंचायतीत तीन वार्ड मधून 7 ग्रामपंचायत सदस्यासाठी सर्व धर्म समभाव ग्रामविकास पॅनल व जय शिवशंभो ग्राम नवनिर्माण पॅनल असे दोन पॅनलचे प्रत्येकी एक प्रमाणे 14 उमेदवार व वार्ड क्रमांक दोन मधून एक अपक्ष उमेदवार असे एकूण 15 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. तर सरपंच पदासाठी दोन्ही पॅनलचे प्रत्येकी एक व अपक्ष एक असे एकूण तीन महिला उमेदवार होते.

करोडी येथील मतदार संख्या 1 हजार 20 आहे. या ग्रामपंचायत साठी मतदान प्रक्रिया रविवारी झाली. मंगळवारी तारीख 20 रोजी या ग्रामपंचायत चा निकाल हाती आला. यात सर्व धर्म समभाव पॅनलच्या सुनिता देविदास गवांदे यांना 557 सर्वाधिक मते मिळाली. तर त्या खालोखाल सुलोचना मंगेश जाधव यांना 415 तर अपक्ष वर्षा अण्णासाहेब जाधव यांना शून्य मते म्हणजेच एकही मत मिळाले नाही. विशेष म्हणजे त्यांनी या निवडणुकीसाठी मतदान सुद्धा केले आहे.

तर सात सदस्यांमधून सर्व धर्म समभाव पॅनलचे सोमीनाथ राधाकिसन नवले, सोनाली जनार्दन दवंडे, शिंदूबाई कडूबाळ गडगूळ, योगेश्वरी समाधान जाधव, दगडू रामभाऊ चव्हाण व मनीषा कैलास जाधव हे सहा सदस्य निवडून आले. मात्र या निवडणुकीत जय शिवशंभो ग्राम नवनिर्माण पॅनलला सोमीनाथ रावसाहेब गोल्हार यांच्या रूपाने एकमेव जागा मिळाली. तर अपक्षाला मात्र येथे मतदारांनी थारा दिला नाही. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गावात जल्लोष करत हनुमान मंदिरासह गावातील महापुरुषांचे दर्शन घेऊन अभिवादन केले. दरम्यान दौलताबाद पोलीस ठाण्याच्या वतीने करोडी येथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *