
वाळुज महानगर, (ता.23)- विनापरवाना व बेकायदेशीर रित्या अत्यंत निर्दयीपणे चारचाकी वाहनात कोंबून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गायी आणि वासरांची वाळूज पोलिसांनी सुटका करून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (ता.23) रोजी सकाळी 7:45 ते 8 वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यासमोर करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी मुस्ताक रा. नेवासा, अंकुश उत्तम मुळे रा. पटेलनगर छत्रपती संभाजीनगर व ओंकारेश्वर अशोकराव पाटील रा. बजाजनगर एमआयडीसी वाळूज यांनी संगणमत करून 40 हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची व विटकरी रंगाचे ठिपके असलेली एक गाय, 30 हजार रुपये किमतीची एक जर्सी जातीची गाय, 10 हजार रुपये किमतीची लाल रंगाची एक गाय, 5 हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे एक गोऱ्हे, 10 हजार रुपये किमतीचे एक जर्सी जातीचे गोऱ्हे, 5 हजार रुपये किमतीचे एक खिल्लारी जातीचे गोऱ्हे अशा गायी व वासरांना निर्दयपणे महेंद्रा जितो चारचाकी गाडी पिकअप (एम एच 12, एस एफ – 0415) या वाहनात कोंबून त्यांची बेकायदेशीररित्या वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जात होते. 
वाळूज ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाने यांना या घटनेचा सुगावा लागताच त्यांनी सहकार्यास वाळूज पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी (ता.23) रोजी सकाळी 7:45 ते 8 वाजेच्या सुमारास वाळूज पोलीस ठाण्यासमोर नाकाबंदी करून पिकअप गाडी अडवून गायी आणि वासरांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी गाई वासरांसह महेंद्रा चारचाकी पिकअप गाडी. असा एकुण 2 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस ताब्यात घेतले. 
याप्रकरणी पोलीस अंमलदार सचिन भास्कर त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहन चालक व जनावरे भरून देणारा तसेच स्वीकारणारे मुस्ताक, अंकुश मुळे व ओंकारेश्वर पाटील यांच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयतेने वागविनेस प्रतिबंधक अधिनियम 1960 कलम 11(1)(डी), महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम 1995. कलम 5(ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहे.
