वाळूजमहानगर (ता.6) भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक महिला व एक पुरुष असेल दोघे जागीच ठार झाले. ही अपघाताची घटना वाळूज येथील नगर- छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील माइलस्टोन हॉटेलसमोर सोमवारी (ता.6) रोजी दुपारी घडली.

अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की,
किशोर कचरू सोनवणे (वय 40), रा. तुर्काबाद, ता. गंगापूर आणि मनीषा पुंजाराम बिडवे (वय 37), रा. समता कॉलनी, वाळूज हे सोमवारी (ता.6) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच 20,, डीए- 7184)ने वाळूजकडे येत होते. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनर (एमएच 14, एचएस- 7907)ने किशोर सोनवणे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. 
त्यामुळे दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्याच वेळी त्यांच्या अंगावरून कंटेनरचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक कंटेनर अपघात स्थळीच सोडून फरार झाला. या अपघाताची माहिती मिळताच वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे, उपनिरीक्षक अजय शितोळे, सुधाकर पाटील, विजय पिंपळे, अमोल गायकवाड, गफार शेख यांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह घाटी रुग्णालयात हलविले. या अपघाताची नोंद करून वाळूज पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले.
