
वाळूजमहानगर, (ता.3) – भरधाव जाणाऱ्या एका कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्या एका 34 वर्षे कामगारास जोराची धडक देऊन चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (ता.3) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्यावर झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, कंटेनर (एम एच 20, सी टी -0176) हा वाळुज औद्योगिक वसाहतीतून पंढरपूरकडे भरधाव वेगात जात होता. त्याचवेळी शिवानंद किसनराव कल्याणकर (वय 34) रा. शिरड, ता. हदगाव जि. नांदेड, हल्ली मुक्काम रांजणगाव (शेणपुंजी) हा कामगार रस्ता ओलांडत असताना त्याला कंटेनरने चिरडले. रांजणगाव (शेणपुंजी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या कॉर्नरवर बुधवारी (ता.3) रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात कल्याणकर हा गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

अपघात होताच काही प्रत्यक्षदर्शींनी धावपळ करत कल्याणकर याला रांजणगाव ग्रामपंचायतच्या रुग्णवाहिकेने उपचारार्थ घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या अपघाताची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
