
वाळूज महानगर, (ता 18) – भरधाव जाणाऱ्या एका ऑडी कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप बोलेरो ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालक गंभीर झाला. सुदैवाने कार मधील एअर बॅग उघडल्याने तो बचावला. हा अपघात वाळूज परिसरातील तिसगाव चौफुलीवर गुरुवारी 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जयेश राठोड व कृष्णा चव्हाण हे महिंद्रा बोलेरो (एमएच 15, जेसी -3101) मधून ऊस घेऊन चिकलठाणा येथून चाळीसगावकडे ऊस जात होते. गुरुवारी 18 डिसेंबर रोजी तिसगाव चौफुलीजवळ त्यांची पिकअप बोलेरो पंचर झाल्याने त्यांनी बोलेरो रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दरम्यान, सकाळी सुमारे 8 आठ वाजेच्या सुमारास भरधाव आलेली ऑडी कार (एम एच 02, डीएम- 5577) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरोला पाठीमागून जोरात आदळली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, ऑडी कारने बोलेरो गाडीला जवळपास 100 फूट पुढे ढकलले. 
या अपघातात ऑडी कार चालक गंभीर जखमी झाला असून कारमधील दोन्ही एअरबॅग उघडल्या आहेत. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती.

