March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.10) – दवाखान्याजवळ उभी केलेली कार रिव्हर्स आली आणि मेडिकल दुकानाच्या तीन पायऱ्या चढून थेट काउंटरला धडकली. सुदैवाने मेडिकल दुकानात ग्राहक नव्हते. नसता मोठी जीवित हानी झाली असती. मात्र काऊंटर व कारचे मोठे नुकसान झाले. ही घटना सोमवारी (ता.10 रोजी दुपारी घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एक महिला (एम एच 20, जी क्यु-7068) या कार मधून बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात असलेल्या एका दवाखान्यात आली. दवाखान्याच्या काही अंतरावर एका जनरल स्टोअर समोर कार उभी करून महिला व तिचा पती दवाखान्यात गेले. काही वेळाने कार आपोआप रिव्हर्स आली. आणि रस्ता ओलांडून जवळजवळ दीड हजार फुटावर असलेल्या मेडिकलमध्ये घुसली. ही कार इतक्या वेगात होती की, ती तीन पायऱ्या चढून थेट काउंटरला धडकली. यावेळी उन्हाचा कडाका असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता. आणि मेडिकल दुकानामध्येही ग्राहक नव्हते. त्यामुळे या घटनेत कोणतीही जखमी वा जीवित हानी झाली नाही. मात्र दुकानातील काउंटर व कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अत्यंत गजबजलेल्या चौकात घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. दरम्यान कार चालकाला हा प्रकार समजताच तो धावतच दवाखान्यातून बाहेर आला. मी व्यवस्थित कार बंद करून हॅन्ड ब्रेक लावले होते. असे स्पष्टीकरण देत या घटनेबद्दल चालकाने कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कार रिव्हर्स आली असावी असे त्याने सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *