
वाळुज महानगर, (ता. 22) – भरधाव जाणारी आयशर ट्रक व दुचाकी यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात भाऊ व बहीण असे दोघे जखमी झाले. हा अपघात नगर ते संभाजीनगर रोडवरील ईसारवाडी फाट्यावर शुक्रवारी (ता.22) रोजी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चितेगाव येथील विराज निजाम शेख हे शुक्रवारी (ता.22) रोजी दुपारी वैजापूरवरून बहिणीला घेऊन दुचाकी (एम एच 20, एफ क्यु-2127) वरून चितेगावला येत होते. ते छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवरील ईसारवाडी फाटा येथे वळण घेत असताना भरधाव आलेला आयशर ट्रक (एम एच 04, डी के -1533) व शेख यांच्या दुचाकीत जोराची धडक झाली. त्यात विराज शेख व त्याची बहीण असे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच लिंबे जळगांव पॉइंटवर असणारी जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानच्या ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी अपघातस्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना जिल्हा रुग्णालय संभाजीनगरला दाखल केले. दोघांवर घाटीत उपचार सुरू आहेत.
