
वाळूज महानगर, (ता.27) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात आयशर ट्रकने स्कुटीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील पती-पत्नी चाकाखाली चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:45 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात झाला.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, मानसगाव तालुका धाराशिव जिल्हा (हल्ली मुक्काम साठेनगर वाळूज) येथील अनिता संजय राऊत (34) व संजय पंडित राऊत (38) हे पती-पत्नी विना नंबरच्या स्कुटीवरून छत्रपती संभाजीनगरकडून वाळूजकडे येत होते. त्यांच्या स्कुटीला पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात आयशर ट्रकने जोराची धडक दिली. सिडको वाळूज महानगर -1 येथील देवगिरी नदीच्या पुलाजवळ दुपारी तीन पंचेचाळीस वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघेही पती-पत्नी स्कुटीवरून खाली पडून ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वाळूज वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शंकर शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण फौलाने, विकास कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर साळवे, वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल मनोज बनसोडे, सुहास मुंडे आजींनी घटनास्थळी धाव घेत राऊत पती-पत्नीचा मृतदेह घाटी रवाना केला. 
वाहतुकीची झाली कोंडी –
या अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाल्याने छत्रपती संभाजीनगरकडून वाळूजकडे तसेच वाळूजकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या दुतर्फा वाहनांची मोठी कोंडी झाली होती. वाळुज एमआयडीसी व वाहतूक शाखेच्या पोलिसांनी अपघातग्रस्त स्कूटी ठाण्यात जमा करून वाहतूक सुरळीत केली. तोपर्यंत अपघात स्थळापासून पंढरपूर पर्यंत व ए एस क्लबपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
