
वाळूजमहानगर, ता.6 – गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी गंगापूर तालुक्यातील पिंपरखेडा, लांझी, नारायणपूर, शिवराई, टेंभापूरी, गुरूधानोरा, जिकठाण, अंबेलोहळ आदी गावांना (ता.5) रोजी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना आमदार सतीश चव्हाण म्हणाले की, उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या वाळूजपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या परिसरातील अनेक गावांमध्ये अद्यापही मूलभुत सोयीसुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. मागील पंधरा वर्षांपासून अनेक गावांमध्ये रस्ते, शिक्षण, आरोग्य, सिंचन आदी मुलभूत प्रश्न जैसे थे आहेत. तालुक्यातील पिण्याचे पाणी, ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पाणी, वीज, रस्ते या मुलभूत गोष्टीसाठी सर्वसामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. या मतदारसंघाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी या परिसराचा मुलभूत विकास करणार होते. मात्र त्यांचा हा विकास फक्त आगदावरच राहिला. वाळूज-लांझी रोड करणार, खाम नदीवर पूल उभारणार, टेंभापूरी धरणात जायकवाडीचे पाणी आणणार, जिल्हा परिषदेच्या शाळा डिजीटल करणार असे आश्वासन दिले होते. मात्र यातील एक तरी आश्वासन पूर्ण झाले का, परिसराचा मुलभूत विकास झाला का याचा देखील मतदारांनी विचार करणे गरजेचे असल्याचे आमदार सतीश चव्हाण म्हणाले. मागील दोन तीन वर्षांपासून मी या परिसरातील अनेक गावांंमध्ये रस्ते, सभामंडप, सुशोभिकरणासाठी भरीव निधी दिला. यापुढे देखील मतदारसंघाच्या विकासासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून गावांच्या विकासासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांना दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश काळवणे, शिवसेना सर्कलप्रमुख मनोज जैस्वाल, मच्छिंद्र देवकर, प्रविण नितनवरे, विठ्ठल साबळे, नारायण चणघटे, लहानू नाडे, नंदू सोनवणे, प्रल्हाद निरपळ, दयानंद साबळे, विजय साबळे, माणिक राऊत, विकास गायकवाड, संजय काजळे, नासेर पटेल, नारायण चणघटे, विकास गायकवाड, अक्षय भवर, विठ्ठल साबळे, तुषार कुंजर, दिपक साबळे, नदीम शेख, मनोज पिंपळे, माणिक राऊत आदींची उपस्थिती होती.
